स्वप्नातली शाळा

Tuesday, January 24, 2012
Posted by MSFT

सारं काही स्वप्नवत, 'शाळेत गेलेल्या सर्वांसाठी' या सुंदर वाक्याने 'शाळा' (पुस्तक/चित्रपट) नावाच्या आख्यायिकेला सुरुवात होते. पुस्तकातली शाळा गेले कित्येक वर्षे मनावर राज्य करून आहे. त्याच अख्यायीकेवर चित्रपट येत आहे असे गेले कित्येक दिवस, साधारण वर्ष-दोन वर्षे ऐकून होतो. या बद्दल उत्सुकता ताणली गेली होतीच. डोम्बिवलीतील 'सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल' शाळेपासून पहिल्या फ्रेमला सुरुवात होते. शिपाई, बाई, दिवसाच्या सुरुवातीला सुरु असणारी शाळेतली साफसफाई, मैदानात अलगद उडणारा पाचोळा, पक्ष्यांचा किलबिलाट, शाळेत अगोदरच जमून दंग मस्ती करणारी मुले-मुली अगदी आपल्यालाच आठवणीतल्या शाळेत घेऊन गेल्यासारखेच. कारण प्रत्येकाच्या आयुष्यातला शाळेतला काळ हा सुवर्ण काळ असतोच. कारण हेच सर्व प्रत्येक प्रेक्षकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेले असतेच, त्याचक्षणी आलेल्या सर्व प्रेक्षकांना आपल्या मनातल्या शाळेत घेऊन जाण्यात दिग्दर्शकाला यश मिळते.



मिलिंद बोकीलांचे 'शाळा' आधी बऱ्याचदा वाचून काढलं होतं. खूप आवडलं होतं. या विषयावर चित्रपट येणार-येणार असेच बरेच दिवस चालू होते, चित्रपटाचे ट्रेलर यु-ट्यूबवर गेले वर्षभर धुमाकूळ घालत होते, पण कोणाच्यातरी कर्माने चित्रपट वर्षभर रखडून पडला. चित्रपटाच्या उत्सुकतेचे कारणही तसेच होते, 'शाळा' ही कादंबरी इतकी आवडली होती, की त्यातल्या प्रत्येक पात्राच्या अक्षरशः प्रेमात पडलो होतो. आजही ती कादंबरी आपल्यासाठी जीव की प्राण अशीच आहे. कादंबरीत उठून दिसणारी प्रत्येक पात्रं चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यात कशी असतील याचीही उत्सुकता होतीच. खूप दिवसांपासून ठरवून, वेळात वेळ काढून 'इनर सर्कल' सोबत पहिला. रिलीजच्या तारखा ठरण्याच्या आधी 'इनर सर्कल'ला सांगून ठेवले होते, की काहीही झाले तरी 'शाळा' बघायला जायचंय. आणि शेवटी कसातरी करून दिग्दर्शकाला वितरक मिळाला, एकदाचा तो थेटरात आला आणि आमचा ठरलेला योग जुळून आला.

१९७५च्या आस पास घडणारी तरल प्रेम-कथा आणि त्याला आणीबाणी आणि नुकत्याच वयात येण्याच्या भावनांची जोडली गेलेली पार्श्वभूमी. डोंबिवलीच्या सटायरची कहाणी, तेव्हाचं डोंबिवली दूर दूरपर्यंत पसरलेलं. या 'कान्हे' नावाच्या खेड्यातली शाळा, 'सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल' आणि कुठल्याही मराठी माध्यमात असतात तशीच डांबरट आणि मस्तीखोर कार्टी. कथा ही नववीत शिकणाऱ्या मुलाची 'मुकुंद जोशी' उर्फ जोश्या आणि त्याच्याशी संबंधित दाखवलेले, पठडीतली आई, मोठी बहिण (उगाच पिडते म्हणून नायक तिला 'अंबाबाई' म्हणतो, आणि तिची व्यक्तिरेखा पण बघताक्षणी राग यावा, अगदी तशीच टिपिकल), शिरोडकर, सु‌‍ऱ्या, फावड्या, केवडा,चित्र्या, बिबिकर, आंबेकर, मांजरेकर सर् (संतोष जुवेकर), अप्पा (दिलीप प्रभावळकर), विशेषतः मुकुन्दाचे वडील (नंदू माधव) आणि नरू मामा (जितेंद्र जोशी) आणि इतर याचं कास्टिंग आणि त्यांचा सहज सुंदर अभिनय हे सगळे एकदम परफेक्टच.

यात चित्रपटभर, जोश्या आणि शिरोडकर मुख्य केंद्रित आणि कायम फोकस मध्ये असणारे. जोश्याच्या ध्यानी-मनी कायम शिरोडकरच. प्रेम म्हणजे नक्की काय? याचा यत्किंचितही दर्प नसलेला जोश्याला आपल्याला शिरोडकर आवडते ती नक्की का? कशासाठी? आणि त्यात अतिशय निरागसतेने जोश्या शिरोडकरला विचारतो 'आपण पुढे काय करायचे?', त्यावेळेस खळखळून हसायला येते... त्यातली शब्दातली निरागसता काळजाचा ठाव घेऊन जाते. अंशुमन जोशीने जोश्या उत्तम रीतीने साकारलाय. संवाद, देहबोली अगदी आपल्या मनातल्या जोश्याशी अगदी तंतोतंत् जुळून येते. केतकी माटेगावकरने 'शिरोडकर' खूप सुंदर निभावली आहे. तिच्या वाट्याला संवाद तसे कमीच पण तिच्या बोलक्या आणि सुंदर डोळ्यांचे हावभाव संवादाची कमतरता जाणवू देत नाहीत. कोवळ्या वयात जाणवणाऱ्या भावना, घराजवळ एका शाळेतल्या मुलाशी बोलताना होणारी मनाची कुचंबणा अगदी सहजतेने साकारली आहे. जोश्याने तिला विचारल्यावर, 'छे ब्वा, आपल्याला तसलं नाही जमायचं काही' म्हणत साकारलेला सीन तर निव्वळ अप्रतिम आणि निरागस.आमच्यासहीत अर्धं पब्लिक नक्कीच 'शिरोडकर'ला बघायला आलं असेल. बाकी फावड्या आणि सु‌‍ऱ्या एकदम झक्कास. फावड्याचा वावर तसा कमीच, गळ्यात शाळेची पिशवी अडकवून फिरणे, भाजीच्या दुकानात शिरोडकरला भाजी घेताना केलेली निरागस मदत, आणि बिबिकरच्या कानफटात मारलेला सीन त्याची उणीव भरून काढतो. पुस्तकात बिबिकर आणि पुढील बाकावरील चिमण्या जरी भावमारू असल्या तरी चित्रपटात खरा भाव सु‌‍ऱ्याने खाल्लाय. अगदी अस्सल 'गाववाला' वठवलाय, 'हाय केवडा मेरी जान', केवडाला आपल्याला लाईन देते का? विचारणे, बिबिकर आणि इस्त्रीवाल्याला 'थोबाड आउट करून टाकल' म्हणत केलेला सीन, आंबेकर आणि मांजरेकर सरांचा काय लफडा आहे विचारात केलेले निरागस पण मावलीछाप . जोश्याच्या म्हणण्याप्रमाणे जसे पोरांचे संच असतात तसेच मवाल्यांच्या संचात 'सु‌‍ऱ्या' अगदी फिट्ट बसणारा. शाळेत असा कोणी ना कोणी असतोच, कोणाच्याही बापाला न घाबरणारा, त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या रूपात आपला शाळेतला मावली मित्र या 'सु‌‍ऱ्या'मध्ये दिसतोच, आणि चटकन मनात म्हणतो 'अरे हा तर आपल्या ___ सारखाच आहे'. असा शाळेत कोणाचातरी मित्र, तर कोणी अश्यांकडून फटके खाल्लेले, खासकरून आपल्या प्रत्येकाच्या शाळेतले घासू, चष्मिश पोरं-पोरी, नेहमीच फटके खाणारी.




"वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गायींच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे."

यातच,बरंच काही सांगून जाणारा, आपल्या शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारा. नाहीतरी,आपण कोवळ्या वयातल्या प्रेमकथेच्या नावाने टीव्हीवर चालणारा अत्याचार सहन करत असतोच, पण शाळा त्याला अपवादच म्हणावा. चित्रपटाच्या बाबतीत प्रयेक गोष्ट सुंदरच आहे, तरीही, काही गोष्टी खटकतात. मुख्य म्हणजे चित्रपटाची लांबी, अजून थोडीशी वाढवता आली असती तरी चालले असते, किंबहुना आवडले असते. दुसरे असे की सहलीच्या वेळी जेव्हा सगळे विद्यार्थी एकत्र शेकोटीला बसलेले असताना, शिरोडकर सगळ्यांच्या नजर चुकवून जोश्याकडे चॉकलेट टाकते. पुस्तकात रावळगावचा उल्लेख असताना चित्रपटात पार्लेचे चॉकलेट दाखवलेले आहे (हा मुद्दा गौण मानता येईल), हे जाणीवपूर्वक केलेले आहे की नाही ते दिग्दर्शकच जाणे, पण ते पाहता क्षणी जाणवते. तीसरे असे की, केटी, अशोक, विजय यांच्या खोलीत 'प्रिंटेड मग' (चहाचा कप) दाखवला आहे, त्या काळी तसे मग, आणि त्यातही 'प्रिंटेड मग' उपलब्ध नसावेत, पण ते ही लक्षात येते, एवढेच चित्रपटाबद्दल खटकते. वैभव मंगले, अमृता खानविलकर यांच्या भूमिकेची काट छाट. आणखीन एक म्हणजे चित्रपटाची सुरुवात एका मस्त छोट्याश्या अँनिमेशनपटाने होते त्यात सगळी इंग्रजी नावं (चित्रपटाची क्रेडेन्शियल्स). मला मराठी चित्रपटात इंग्रजी नावे (क्रेडेन्शियल्स) दाखवली की खूप विचित्र वाटते, जणू दिग्दर्शक अंतरराष्ट्रीय प्रेक्षकाला पकडण्याचा मोह आवरु शकत नाही किंवा आम्हीच मराठी न समजणारे प्रेक्षक आहोत असे तो समजतो. असो, पण दाखवलेले अँनिमेशन नितांत सुंदर सुरु असताना एक नाव वाचले गेल्याचे आठवत नाही, अगदी दिग्दर्शकाचे नाव सुद्धा! तर चित्रपटाचे प्रोमोज सुंदर होतेच, प्रोमो पाहून कोणीही चित्रपटाच्या प्रेमात पडेल असाच. शाळा पाहून आल्यावर, गेले वर्षभर हा चित्रपट वितरकाअभावी प्रदर्शनासाठी कसा काय रखडून पडू शकतो. गेले वर्षभर इंटरनेट, फेसबुक, युट्यूब, माउथ पब्लिसिटी यांचा पुरेपूर वापर सुरूच होता आणि या ना त्या प्रकारे सिनेमाची पब्लिसिटी सुरु होती, तरी पण मराठी सिनेसृष्टीला चित्रपटाबद्दल थोडीशीही माहिती नव्हती ऐकून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

कालच आमच्या मास्तरांच्या मित्राचा म्हणजे 'अमित अभ्यंकरांचा' सिनेमा 'जन गण मन' चा प्रीमियर शो पाहून आलो. चित्रपट अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला गेला आहे. पुन्हा एकदा नंदू माधव आणि संतोष जुवेकर यांचे चांगले काम पाहायला मिळाले.कितीही झाले तरी चित्रपटातल्या कलाकारांसोबत चित्रपट पाहायला येणारी मजा ही वेगळीच असते. चांगल्या कामाची थाप लगेच देता येते. सुरेख दिग्दर्शन, कथा, अभिनय, संगीताची जोड याच्या जोरावर चित्रपट खरच खूप सुंदर झाला आहे. आज चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला गेला आहे. इंटरनेटवर प्रदर्शित होणारा पहिला वाहिला मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाने मान मिळवला आहे. एकदा तरी नक्की पाहावा असा हा चित्रपट झालाय. आमचा अमेरिकेला मैतर 'वैभव गायकवाड' हा इंटरनेटवरून आज हा चित्रपट बघणार आहे, पाहुयात यावर त्याची प्रतिक्रिया काय येते ते.



--
राहुल वेळापुरे

1 comments:

Life After Death said...

 I've read your article & thanks for sharing this kind of unknown info.