हैरान भाय...

Sunday, November 20, 2011
Posted by MSFT




होय!

हैरान भाय..

आमचा ग्रुप त्याला याच नावाने ओळखतो. संगीत ऐकणे आणि संगीताबद्दल बोलणे आमचा आवडीचा टाईमपास. एकत्र असताना 'रहमान'च्या संगीताचा किंवा कोणत्याही गाण्यांचा विषय हा आमच्यात निघतोच. मग प्रत्येकाच्या आवडी निवडी यांवर चर्चा रंगत जाते आणि बरेच काही.

खरंतर, संगीतामधील आपल्याला टेक्निकल काहीच कळत नाही. पण जे काही ऐकतो, ते एकदम लक्ष देऊन, समजून आणि आवडीने ऐकतो. त्यामुळेच आपल्याला रहमान आवडतो. बहुतांशी, रहमानचे आलेले नवीन गाणे ऐकले की, अरे काय हे??? काहीतरीच केले आहे....असे वाटते. नंतर तेच गाणे इतके आवडते की, यात पूर्वी आपल्याला किती विचित्र वाटले होते, असा प्रश्न पडू लागतो. रहमानचे संगीत म्हणजे 'स्लो-पॉयझन' आहे. ज्याप्रमाणे सुरवातीला आपल्यावर फरक जाणवत नाही, पण नंतर नंतर त्याचा प्रभाव जाणवू लागतो. याचे कारण म्हणजे रहमानचे गाण्यातील अफलातून प्रयोग, जे एकदा ऐकल्यावर कधीच कळत नाहीत, पुन्हा पुन्हा ऐकत गेल्यावर जाणवू लागतात.

इतर संगीतकार नियमांच्या पलीकडे जाताना फार क्वचितच दिसतात. पण रहमान दर वेळी त्याच्या प्रयोगामध्ये...आधी मुखडा, नंतर अंतरा, गाण्याला साजेसे, पण गाण्यावर कधीही वरचढ न होणारे प्रयोग करत राहतो. चित्रपट संगीतामधील पारंपारिक नियम त्याने कधीच धुडकावून लावले होते. एका चालीला संगीताच्या वेगवेगळ्या ४ चाली बांधून त्याची एक मास्टर ट्यून तयार करतो, त्यामुळेच एक ट्यून नेहमी वेगवेगळ्या पद्धतीत ऐकायला मिळते.

रहमान त्याच्या सुरवातीपासून ते आत्तापर्यंतच्या प्रत्येक गाण्यांमध्ये त्याच्या चाहत्यांना आणि ऐकणाऱ्याला त्याच्या संगीताप्रमाणे प्रगल्भ करत जातो.



कधी 'दिलसे' मधील 'दिलसे रे'या गाण्याचा शेवट (फिनिशिंग टच) ऐकलाय?? शेवटच्या कडव्यात गायलेल्या 'दिलसे रे, दिल तो आखिर दिल है ना, मिठी सी मुश्कील है ना', या पद्यांना मागे-पुढे करून जो काही ताळमेळ रहमान आणि कोरस यांनी बसवला आहे, तो फक्त 'रहमान'च करू शकतो..



'ताल'मधली गाणी 'ताल से ताल मिला' आणि 'इश्क बिना' या गाण्याचे दुसरे रूप 'ताल वेस्टर्न' आणि 'इश्क बिना (रीप्राईज)'... 'रंग दे बसंती' मधील 'खलबलीचे' सिक्वेल 'बी अ रेबल'.... बॅकस्ट्रीट बॉइजच्या 'एव्हरीबॉडी' गाण्याचे हक्क मिळवता आले नाही म्हणून हिरमुसलेल्या 'मणिरत्नम' यांच्यासाठी त्याच धर्तीवर बनवलेललं 'ओ हमदम....सुनियो रे'....आणि तेच गाणं आपल्या पद्धतीने भारतीय टच मध्ये कसे असू शकते याचा नमुना असलेले 'मांगल्यम्'... 'दिलसे' मधीलच 'जिया जले' गाण्यात केलेल्या लतादिदींच्या सरावाच्या वेळचे टिपलेलल्या त्यांच्या खऱ्याखुऱ्या हास्याचा गाण्यामध्ये वापर... 'रंगीला'मधील आशा भोसलेंच्या आवाजासोबत, फ्लूट, आणि व्हायलिनस् आणि बेसचा याचा केलेला संगम हा आगळा-वेगळा प्रयोग, आणि ताल मधील 'बिट ऑफ पॅशन', 'स्वदेस' मधली शहनाई आणि तीच 'ये जो देस है तेरा' मध्ये शेवटी येणारी शेहनाई (पिक्चरमध्ये पाहिल्यावर त्याचा खरा प्रभाव जाणवतो), माझ्या मते चित्रपटांमध्ये शहनाईचा इतका चांगला वापर आत्तापर्यंत कोणी केला नसावा, जो रहमान ने केला होता आणि चित्रपटाच्या सुरवातीला फिल्म क्रेडीटस् च्या स्वदेस थीममध्ये वापरलेले माउथ ऑरगन, बॉम्बे मध्ये 'कुछ भी ना सोचा' या गाण्यामध्ये केलेला तान्ह्या बाळाचा वापर आणि लहान मुलांबरोबर गायलेलं गाणे, गाण्याच्या शेवटी केलेली तबल्याची आणि स्वतःच्या सुरांची केलेली जुगलबंदी असो किंवा 'रंग दे बसंती'साठी खलबलीच्या धर्तीवर क्रेडीटस् थीम असो .... संगीतामध्ये केलेले एवढे प्रयोग रहमानला 'हैरान भाय' म्हणायला पुरेसे होते.

रहमानचे गाणे म्हणजे एक मस्त स्टोरी असते किंवा स्टोरी-टेलिंगची पद्धत तो त्याच्या संगीतात वापरत असावा. गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही ना काही घडत राहते. नेहमी ऐकताना पुढे काय करून ठेवले आहे किंवा पुढे काय येणार आहे याची कल्पना सुद्धा करता येत नाही, इतक्या अनपेक्षितपणे रहमान गाण्याच्या ट्रॅक्स बदलत राहतो. रहमानचे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर कधीच आवडत नाहीत. नंतर जसे जसे ऐकत जाऊ तसे ते आवडायला लागते, रहमानच्या गाण्याची खरी मजाच यात आहे. पुन्हा पुन्हा ऐका, तेव्हाच कळेल गाण्यात नक्की काय घडते आहे. रहमानच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. त्यांचे वर्गीकरण खऱ्या अर्थाने थोड्याश्या विचित्र पध्दतिने झालेले आहे. खूप लोक असे आहेत की ज्यांनी रहमानच्या संगीत ऐकण्याच्या अनुभवला 'रहमानीझम' नावाचा धर्म म्हणून मानतात आणि त्याच्या प्रत्येक कलाकृतीला उचलून धरतात. तर काही लोक उगाच दुसऱ्यांना फक्त दाखवण्यासाठी 'आम्हाला रहमान आवडतो', पण त्यांना गाण्याशी काही घेणे देणे नसते, कधी समजून घेत नाहीत किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुळात गाणे हे समजून घेतल्याशिवाय त्याचे महत्व कळत नाही, मग ते कोणीही बनवलेले असो. काही गाणी प्रथमदर्शनी आवडतात, काही चित्रपट पाहिल्यावर आवडतात, काही कालांतराने आवडत जातात. आणि तिसऱ्या पद्धतीत मोडणारे म्हणजे आम्हाला काहीही करा रहमान आवडतच नाही यातले, मुळात त्यांना चोप्रा, जोहर, खान टाईपची गाणी आवडतात. मुळात ती गाणी असतात चांगलीच, यात वादच नाही, पण ती तेवढ्या पुरतीच, चित्रपट एकदा चित्रपटगृहातून उतरला की त्यांची गाणी प्लेलीस्ट मधून आपोआप उतरतात, पुन्हा ऐकण्याची इच्छा सुद्धा रेडीओवर लागल्याशिवाय होतच नाही. असो, कोणाच्याही बोलण्याने आपल्या चॅाइसवर काडीमात्र फरक पडत नाही आणि अश्यांना आपण फाट्यावर मारतो.

सध्या सगळीकडे चर्चेत असलेले 'रॉकस्टार' मधील 'साड्डाऽऽऽ हक'.. हिंदीतील आत्तापर्यंतचे ऐकलेले सगळ्यात चांगले गाणे असावे. (मराठीत अवधूत गुप्तेंचा 'कांदे पोहे'चा प्रयोग उल्लेखनीय होता). रहमान स्वतः रॉक संगीताचा काही खास चाहता नसल्यामुळे त्याच्याकडून या प्रकारातील गाणे आत्तापर्यंत त्याने कधी बनवले नव्हते किंवा या प्रकारच्या वाट्याला कधी गेला नव्हता. गाण्यात केलेला 'मोहित चौहान'च्या आवाजाचा चपखल वापर, सोबतीला गिटार वादकांची फौज, बेस गिटारवर 'कीथ पीटर्स', सोबतीला कोरसवर 'क्लिंटन केरेजो' आणि 'मायकल जॅक्सन'ची लीड-गिटारीस्ट 'ओरियांथी' अपेक्षितपणे लीड गिटारवर . तिच्या इलेक्ट्रिक गिटार मधून निघालेला प्रत्येक सूर आणि गिटारवर सराईतपणे फिरणाऱ्या बोटांच्या हालचालीने होणाऱ्या लुट ब्लोचा जसाच्या तसा वापर रहमानने करून गाण्यात कमालीचा जिवंतपणा आणला.



यातीलच 'शहर में हू मै तेरे' गाण्यात, गाण्याची रेकॉर्डिंग करताना येणारी धमाल आणि उडणारी धांदल कशी असू शकते याची जाणीव देताना केलेला वेगळा प्रयोग आणि 'किशोर'दांच्या यॉडलिंगची आठवण करून देणार्‍या करामती आहेत. 'शहर में' मधला शेवटचा गिटार पीस ऐकून क्षणभर मार्क नॉफलरच अवतरतो की काय असे वाटते.
बहुदा रहमान, गाडीच्या आणि रेल्वेच्या ट्रॅक पासून निघणाऱ्या एका विशिष्ट आवाजाच्या पॅटर्न त्याला खूप आवडत असावा. हे त्याने बनवलेल्या 'छैय्या छैय्या' गाण्यावरून दिसले होते, त्याने रेल्वेच्या आवाजाचा खराखुरा वापर न करता, त्याने स्वतःचा बनवलेला पॅटर्न वापरला आणि एवढ्यावर न थांबता 'स्लमडॉग मिलियनेयर'च्या 'ओ साया' या साउंडट्रॅकमध्ये सुद्धा अश्या पॅटर्नचा पुन्हा वापर केला. या गाण्याचे सौंदर्य फक्त ह्रीदम नसून रहमानचे आलाप, सोबतीला अंतरराष्ट्रीय गायिका "MIA" हीचा मुख्य भागांमध्ये वापरलेला आवाज व कोरसमध्ये लहान मुलांच्या निरागस आवाजाचा केलेला वापर गाण्याचे मुख्य आकर्षण ठरतात. गाण्यावर चित्रित केलेल्या दृश्यातसुद्धा मुंबईतल्या झोपडपट्टीतून सुसाट पळणाऱ्या लहान मुलांच्या वेगाला धरून कॅमेरयाची मुव्हमेंट आणि रहमानचे संगीत चपखल बसते. बहुतेक हे गाणे चित्रपटात मुंबईतल्या झोपडपट्टीचे जीवन दाखवायला मदत करते.

त्यातीलच 'मौसम एंड एस्केप' या फ्युजनमध्ये केलेल्या फ्रेनेटिक सीतार, व्हायोलीन्स, इलेक्ट्रिक गिटार, ड्रम्स आणि कोरसच्या सहाय्याने सुंदर मेळ घातला आहे. मला हे गाणे ऐकताना नेहमीच दिनक्रमाची आठवण येते. गाण्याची सुरुवात एकदम संथ गिटारवरून करतो, जसे काही पहाटे पहाटे रेल्वेमध्ये गर्दी कमी असते, नंतर दिवस जसा वाढत जातो तसा रहमान गाण्यात एक एक करून वाद्यसंख्या वाढवत जातो. पुन्हा दुपारच्या वेळेस जसा गर्दीचा आणि उन्हाचा जोर वाढतो तोपर्यंत रहमान गाण्यात वरच्या पट्टीत कधी पोहोचतो ते कळतच नाही.... शेवटी जशी संध्याकाळची कातरवेळ येते, तेव्हा रहमान वरच्या पट्टीतून पुन्हा जैसे थे करत एक एक वाद्य संख्या कमी करून गाण्याला संपवून टाकण्याच्या बेतात येतो. तो अनुभव म्हणजे पूर्ण दिवस जगल्याचा. म्हणूनच ही थीम मनात घर करून जाते. जिवाच्या आकांताने वाजवलेली सीतार आणि ड्रम्समुळे गाणे पुन्हा पुन्हा ऐकून सुद्धा मन भरून येत नाही.




'ताल'मधील 'नही सामने ये अलग बात है' हे गाणे एकदम बेस्ट. कोरस, ड्रम्स, सीतार, बेस गिटार, व्हायोलीन्स आणि पियानो याचा जो काही वापर केला आहे त्याने गाण्याचा गोडवा आजही कायम ठेवला आहे अजूनही कुठे एकट्याने ड्राईव्ह करत असताना किंवा पावसाळ्यात मस्त चहा आणि भजीच्या साथीने पावसाचा अनुभव घेत हे गाणे ऐकण्याचा अनुभव म्हणजे एकदम भारीच. हरिहरन आणि सुखविंदर सिंग यांच्या आवाजाचा वापर, खरेतर ऐकताना नेहमी वाटायचे की गाणे फक्त हरिहरन यांनी गायले आहे, पण तालच्या इनले-कार्डवर दिलेल्या क्रेडीटस् प्रमाणे सुखविंदरच्या आवाजाचा वापर नक्की कुठे झालाय हे कळण्यासाठी हे गाणे खूप वेळा ऐकले होते, तेव्हा कळले की सुखविंदर च्या आवाजाचा वापर गाण्याच्या शेवटी केला होता. एका कार्यक्रमात 'सुभाष घई' गाण्याच्या आठवणी सांगताना म्हणले होते, तालमधील गाणी एका टेक मध्ये संपवली होती, पण या गाण्याला काही केल्या फायनल टेक मिळत नव्हता. रहमानला काही केल्या हे गाणे मनाप्रमाणे वाटत नव्हते. त्याने हे गाणे एकूण सहा वेळा वेग-वेगळ्या चालींमध्ये बनवले होते. शेवटी काही केल्या सातव्या गाण्याला फायनल केले. हे ऐकून गाण्यावर घेतलेली मेहनत गाण्यात दिसून येत होतीच. सुभाष घईंनी गाण्याचे उत्कृष्ट चित्रीकरण करून या गाण्याला पूर्णपणे न्याय दिला आहे.

'गुरु' चित्रपटातील 'रात का शौक है' हे गाणे म्हणजे रहमानचे आणखीन एक मास्टरपीस. पियानो आणि सौम्या रावच्या सुंदर आवाजाला बांधून त्याने जे काही केले आहे ते म्हणजे उल्लेखनीय. बहुदा गुरूमधील हे सगळ्यात चांगले गाणे. पण रहमानने या गाण्याला अल्बम मध्ये जागा न देता, चित्रपटात पार्श्वभागात वापरले. विद्या बालनसाठी त्यात ते अगदी चपखल बसले, जणू काही तिलाच डोळ्यासमोर ठेऊन हे गाणे बनवले आहे. आजही बाहेर मस्त पाऊस पडत असताना, गॅलरी मध्ये बसून, मस्त गरम गरम चहा आणि भजी यांच्या साथीला ह्या गाण्याची मजा अनुभवण्याचा आनंद हा रहमानच देऊ शकतो. त्यातील इतर गाणी सुद्धा तितकीच उत्तम. या अल्बममध्ये केलेला वाद्यांचा नवा प्रयोग रहमानला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतो.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे सांगितला देशाचे बंधन नसते त्यामुळेच चित्रपट,पार्श्वसंगीत, प्रायव्हेट अल्बम इथपर्यंत न थांबता, त्याने वॅारीयर्स बिटवीन हेवन अॅंड अर्थ' आणि 'बॉम्बे ड्रीम्स' नावाच्या स्टेज-प्ले मध्ये सुद्धा संगीत दिले होते. यात दिलेले संगीत अंतरराष्ट्रीय दर्ज्याला अनुसरून संगीतातील दर्जा दाखवून दिला होता. 'बॉम्बे ड्रीम्स' च्या टायटल ट्रॅकच्या सुरुवातीला जिवंत स्वरूप देण्यासाठी रहमानने मुंबईतल्या बाजाराच्या धावपळीचा आणि गोंधळाचा आवाज वापरला होता. 'रुपयाला एक' करत ओरडत जाणारा लहान विक्रेता, कोल्डड्रिंक्सच्या बाटल्यांचा आवाज, भाजीवाल्यांचा गोंधळ, दुकानात लावलेल्या रेडीओवर येणाऱ्या गाण्याचा आवाज, डब्बा बाटली भंगारवाले ओरडत जाणारे भंगारवाल्यांच्या आवाजाचा जसाच्या तसा वापर, जिवाच्या आकांताने वाजवलेले ड्रम्स, व्हायोलीन्स आणि गिटार... गाण्यातल्या ह्या सगळ्या डीटेल्स, गाण्याला जिवंतपणा देण्यासाठी केलेला खटाटोप हा त्याच्या प्रगल्भतेचा नमुना.

शेखर कपूरने पॅसेज नावाचा एक चित्रपट केला होता. रहमानने त्याला पार्श्वसंगीत दिले होते. यात इतर गाण्यांबरोबरच एक फ्रेंच भाषेतील आरिआ नावाचा प्रकार होता. शेखर हा आरिआ लोकांना ऐकवून त्याचा संगीतकार ओळखयला सांगत असे आणि लोक मोझार्ट, बेथोवनसारख्या मोठमोठ्या पाश्चात्य संगीतकारांची नावे सांगायची. मग हे गाणे एका भारतीय संगीतकाराने चेन्नईमध्ये रेकॉर्ड केले आहे हे सांगितल्यावर त्यांचा चेहेरा बघणेबल होई.


'हे हे हे रजनी'

जेव्हा एक एक करून S-U-P-E-R-S-T-A-R R-A-J-N-I असे शब्द जेव्हा 70MMच्या पडद्यावर आदळतात, तेव्हा चित्रपटगृहाच्या पडद्यालासुद्धा प्रेक्षकांच्या आवाजाच्या उच्च पातळीच्या परीक्षेला सामोरे जावे लागते. रजनीच्या एन्ट्रीला संगीतकार 'देवा'ने बनवलेली 'अन्नामलाई' थीम ही आत्तापर्यंत जवळपास सगळ्याच चित्रपटात वापरली जायची. रहमानने 'शिवाजी-द बॉस' चित्रपटातील सुरुवातीच्या सिक्वेन्ससाठी, आजपर्यंतचे संगीताचे पारंपारिक नियम मोडीत काढत रजनीच्या नावाभोवती असलेल्या वलयाला शोभेल असे संगीत बनवत नवीन प्रयोग केला. रजनीच्या नावाच्यावेळी हे हे हे या शब्दांचा वापर टाळू शकला नाही. हे सगळे ऐकूनच जाणवते की रजनीकांत नावाची व्यक्ती काय चीज आहे ते!!




'एन्धीरन' (रोबोट)मध्ये, रहमान इथेच न थांबता स्वतःचेच नियम पुन्हा मोडीत काढत याही पेक्षा अजून पुढे जातो, यात तो कोणतीही पूर्वीची किंवा नवीन थीम न वापरता त्यातीलच 'अरिमा अरिमा' गाण्याचे पार्श्वासंगीतातील स्वरूप वापरण्याचे धाडस करतो, जे चित्रपटात अॅक्शनदृश्यात पुन्हा पुन्हा वापरले गेले, जो मुळात शंभर-एक पीसचा ऑर्केस्ट्रा आहे.... यातूनच रजनीच्या नावाची प्रचीती येत राहते, आणि त्याला सगळ्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या संगीतात दाखवणाऱ्या रहमानची सुद्धा.




माझ्या मते, पार्श्वसंगीतात रहमानचा हाथ कोणीच धरू शकत नाही (निदान हिंदी चित्रपटांमध्ये तरी!). रहमान थीम आणि पार्श्वासंगीत बनवताना खऱ्या अर्थाने मुक्त आणि स्वच्छंदी असतो. बॉम्बेमधील बॉम्बे थीम आणि जिवाच्या आकांताने ओरडत जाणारे पार्श्वसंगीत तर आजही अंगावर काटा आणतो. त्याला हवे तसे प्रयोग त्यात करत जातो. मग तो 'रंग दे बसंती'च्या क्रेडीटस् च्या वेळी केलेला प्रयोग असो, किंवा मग दिलसेचे, रोजा, युवा, सिवाजी, आणी लगानचे पार्श्वसंगीत असो. लगानमध्ये खरी मजा तर पार्श्वसंगीताने आणली होती, रहमानशिवाय लगान खऱ्या अर्थाने अर्धवट वाटला असता.


रहमानच्या पार्श्वसंगीतातील काही नमुने:

युवा


शिवाजी


दिलसे


चायना टाऊन - फायर



तसे रहमानबद्दल खूप काही आधीच लिहिले गेले आहे, आणि लिहिण्यासाठीही खूप काही आहे, पण इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच की रहमान बऱ्याचदा दुर्लक्षित राहिला जातो. 'शीला की जवानी', 'छम्मक छल्लो' या सारखी गाणी एकदा ऐकून संपून जातात, रहमान खऱ्या अंशी या गाण्यांच्या लाटेमध्ये दुर्लक्षित राहिला जातो. रहमानच्या रॉकस्टार मध्ये ऐकलेली गाणी आत्ता कुठे समजायला लागली आहेत. रॉक जॉनर वर असलेल्या चित्रपटासाठी रॉकव्यतिरिक इतर गाणी बनवण्याचे धाडस हाच करू शकतो.....

रहमान आणि त्याच्या संगीतावर लिहिण्यासारखे खूप काही आहे, त्यावर इतक्यात थांबू शकत नाही.... पुन्हा एकदा वेळ काढून आणखीन काही दुर्लक्षित गाण्याबद्दल ऐकायला आणि लिहायला आवडेल... कधी तरी करूच...!!!!!!

2 comments:

AVVEER said...

रहमानची गाणी सुंदर असतात यात वादच नाही पण काही अल्बम तर अक्षरश: सॉलिड असतात. 'रोजा' आपला ऑल टाईम फेवरेट! :)  

Ravi U said...

मला वाटतं रहमानचा हा कौशल इनामदार यानी केलेला हा ॲनलिसिस तुम्हाला आवडेल. यात रहमान हा किती प्रगल्भ आहे हे कळतंच पण स्वत: इनामदार किती बुद्धिमान आहे हे ही कळतं. मलाही रहमान आवडतो पण तो का आवडतो ते या लेखामुळेच कळलं.
http://musicandnoise.blogspot.in/2006/09/rahman-i-and-sound-of-music_22.html