मला देवाने पछाडलं...!!!!

Wednesday, April 27, 2011
Posted by MSFT




शिष्यास न लाविती साधन।
न करविती इंद्रिय दमन।
ऐसे गुरू अडक्याचे तीन……
मिळाले तरी त्यजावे..!!


हुश्श... सुटलो, झाल्या सगळ्या प्रथा पार पाडून…….

कालपासून मला काय झालंय, काहीच कळत नव्हतं. संत तुकारामांनी म्हणल्याप्रमाणे "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" सारखे ती एक व्यक्ती इतक्या जबरदस्त तऱ्हेने माझ्या मागे लागली कि, पळताभुई थोडी करून सोडली, आयुष्यात ज्या व्यक्तीचा कधीच विचार केला नव्हता, ती सपाटून मागे लागली होती, मी घरी असताना, पेपर वाचताना, लोकल मध्ये प्रवास करताना, ऑफिस मध्ये, रस्त्यांवर अक्षरशः सगळीकडेच, मला नको नको करून सोडलं होतं त्याने. त्याचा तो चेहरा, त्याचे ते व्यक्तिमत्व अक्षरशः सगळीकडेच दिसायला सुरवात झाली होती एव्हाना. समोर येईल ती व्यक्ती मला त्याच माणसासारखी वाटत होती, ट्रेन मध्ये सगळे चेहरे सारखेच, ऑफिस मध्ये बॉसचा चेहरा ही तसाच वाटायला लागला होता. जेथे जाईल तेथे, रस्त्यावरी होर्डिंग मध्ये सुद्धा तोच, पेपर मध्ये सुद्धा तोच, टीव्ही वर तर विचारायची सोयच नव्हती, प्रत्येक सिरीयल मध्ये सुद्धा, टीव्हीवरील सासू सुना यांच्या भांडणामध्ये सुद्धा, हद्द…..दबंग बघताना सुद्धा तोच, सलमानच्या जागीही, त्याचाच चेहरा दिसायला सुरुवात झाली होती, सार्वजनिक सुलभ मधील ग्राफिटी मध्ये, ऑफिस मधल्या संगणकावर सुद्धा ऑफिस च्या नावाचा वॉल-पेपर लोगो असायचा, त्याच्याजागी सुद्धा मला तीच व्यक्ती गिरे तो भी टांग उपर अश्या अविर्भावात. एखाद्या प्रियकराला आपली प्रेयसी सगळी कडे दिसते अगदी तशीच....!!!!!!




मग करावे तरी काय, म्हणून मुद्दाम डोक्याला त्रास द्यायचं म्हणून मी आपला एका मागो- माग एक न्युज चायनल बदलत जात होतो, टीव्हीशी आणि त्याच्या रिमोटशी माझी झटापट सुरूच होती, बाकीच्या चायनल कडे माझी ढुंकून बघायची सुद्धा इच्छा झाली नाही, त्यांना वाळीतच टाकले होते, बिचारे बाकीच्या चायनल वरचे सगळे कलाकार आ वासून माझ्याकडे बघत होते जणू काही, कि आम्हाला बघणारे लोक, यांना झालाय तरी काय, याला कारण विषयच तसा होता.....

न्युज चायनलवाल्यांनी तर जणू काही ठेकाच घेतला होता त्यांच्या प्रसिद्धीचा, प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याचे दर्शन घडवून आणले होते, एव्हाना १०० वेळा घडून गेले असेल दर्शन. ते ही असे कि कशा पद्धतीने एक व्यक्ती स्वघोषित रित्या देव बनते, कोण-कोण प्रसिद्ध व्यक्ती यांच्या दर्शनाला जायचा, गेला होता, वगैरे वगैरे, कोणाची कशी श्रद्धा होती, कोण काय करायचा वगैरे वगैरे, जणू काही हुतात्माच, असे काही दाखवले जात होते, कि बाबा नाही बाप सोडून गेल्यासारखे..!! बरं, गेले तर गेले, त्या बद्दल दुखःही आहेच, पण पुन्हा येणार या संकल्पनेने डोक्याला झिणझिण्या आल्या होत्या... का, कधी, कसे, कुठे सगळेच सविस्तर सांगितले जात होते... मनात भीती आणि आनंद दोन्ही भावना उफाळून येत होत्या, जर हे येऊ शकतात तर आमच्या पूर्वजांनी काय कुणाचं घोडं मारलं होतं?

अक्षरशः सरकार मधली एखादी पावरफुल व्यक्ती जर इतकी इमोशनल असती तर त्यांनी भारताचे सगळेच व्यवहार काही दिवसां करिता बंद करून ठेवले असते. आणि ते घडलेही राज्यस्तरावर, काही भागात व्यवहार बंद करण्यात आले सुद्धा..

एव्हाना माझाही का कुणास ठावूक थोडा का होईना विशास बसल्या सारखे झाले होते, मी पण आजचाच तरुण, असे होणारच, पण जिथल्या तिथे थांबवले स्वतःला. पण करणार काय, कारणच तसे होते, मला कोणाच्याही सांगण्यावरून कोणावर विशास ठेवावा, कोणावर नाही याची पूर्ण जाणीव होतीच.

पण याला कारणही तितकेच मजबूत होते, ते म्हणजे मी ज्याला देवाचा दर्जा दिला, तो, साक्षात ' विक्रमादित्य, त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा माझा वेगळाच प्लान होता (वैयक्तिकरित्या). पण एकंदर काही कारणाने तो प्लान फसला, आणि त्या दिवशी घडलेही निराळेच आणि दिवसभर विक्रमादित्य बद्दल ऐकले, वाचले, बघितले त्यावर विशास बसला नाही, असो तो त्याचा वैयक्तिक प्रश्न...!!!

विश्व जिंकल्यावर दुसऱ्यांदा इतके भावूक होताना (अश्रू अनावर होताना) पहिले होते मी, आणि मी ही भावूक झालोच, पण मला कोण विचारणार.

तिकडे सरकारचे ही तसेच, काही मुद्द्यांवरून त्यांनी वेळेचे (कामाचे) कारण देऊन आसाममध्ये मतदान करणे टाळले, आणि गुरूंच्या दर्शन जाऊन बसले. इकडे असे असताना, तिकडे काहींची तळमळ स्पष्ट दिसून येत होती, आपल्याकडून थोडेसे का होईना दुर्लक्ष होते आहे असे कळताच बच्चन कुटुंबीयांनी यात उडी मारली, आम्हाला ही गहिरे दुखः झाले असे व्यक्त (टीव-टीव) करून मोकळे झाले.

दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाची कथा सुद्धा जेणेकरून तशीच, पण या वेळी त्याची पातळी आणखीन खोल झाली होती. पार डोक्याची दही करून ठेवली होती. शेवटी आम्ही ठरलो भरकटलेले, या-त्या कारणांवरून इकडे जाऊ का तिकडे जाऊ अशी व्यथा झाली,

पण इतके नक्की होते, ज्या भारताला, महाराष्ट्राला साई बाबा(खरे), तुकाराम महाराज, रामदास स्वामी, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, यांची परंपरा होती, बहुधा ती बदलणार आहे भविष्यात काही नवीन नावे पुढे येणार अश्या शक्यतेला सुरुवात झाली होतीच, सध्याचे अभ्यासक्रमातील धडे जाऊन, काही नवीन धडे पुस्तकात येणार होते, इतिहास सुद्धा बदलणार होताच, शिवाय गणितात पाढे बे एके बे न होता २००० एके २००० अशी सुरुवात होणार याची चिन्हे स्पष्ट दिसायला लागली होती, आत्ताची पिढी स्मार्ट म्हणवली जाते, भविष्यातील पिढी सुपर-स्मार्ट वगैरे असेच काहिती तरी घडणार हे भविष्य दिसायला लागले होते

आमचे बांधव यांनी तर आकडेवारी मध्ये सर्वोच्च पातळी गाठून जमाना झाला होता, ए. राजा, कलमाडी दादा, सम्राट अशोक, राडिया ची नीरा, नवीन साई बाबा, आसाराम बापू, अजून बरेच मोबाईल युगातले साधू संत (मोबाईल वर अभंग लिहिणारे) यांचे उत्पन्न आणि संपत्ती पाहून यांनी कलामांचे भाकीत भारत २०२० मध्ये महासत्ता होणार” वेळेआधीच पूर्ण होणार, आणि या चित्रपटाची झलकच दाखवली होती, नवीन भारताचे गणित मांडून ठेवले होते.

पाकड्या देशात जसे मेंदू वर संस्कार करतात, तसेच संस्कार आमच्या मेंदूवर होण्यास सुरुवात झाली होती केव्हाचीच, शिक्षण करून, मास्टर डिग्री घेऊन १०००० ते ५०००० च्या घरात पगार घेण्यात काहीच अर्थ नाही, अशी समजूत होण्यास सुरुवात झाली होती.आमच्या आयुष्याचे ध्येय बदलण्यास सुरुवात झाली होती. मस्तपैकी जनतेची तेवढ्यापुरती सेवा करायची, एकदा निवडणूक जिंकलो कि घोटाळे करत बसायचे, पकडले गेलो नाहीच तर आयुष्याचे सार्थक, आणि पकडलो गेलोच तरी सुद्धा चांदी, कारण भारतामध्ये वजनदर व्यक्तीला शिक्षा नावाचा प्रकार कधी झालाच नाही. झालाच तरी जमीन घेऊन हिंडत बसायचे बोंबलत. आपला इतिहास साक्षी आहे याला…!!

बरे असे काही जमले नाही तर, किडे, झुरळे, पाली, कुत्री, डुकरे आहेच आपल्याला देवत्व द्यायला. एकदा त्यांच्याकडून हाताला-पायाला चावून घ्यायचे, आणि देव म्हणून बसायचे एकाच जागेवर, लागते काय, यासाठी तर शिक्षण सुद्धा लागत नाही, म्हणजे भांडवल सुद्धा नसेल तरी उत्तम. माझ्या ओळखीतल्याला, गावी मध्ये असताना त्याला एका कुत्र्याने अक्षरशः पार लोळवला होता, अक्षरशः लचके तोडून खाल्ला होता त्याला, त्याने त्याचे नाव बदलून स्वतःला विठ्ठल-पांडुरंग, असे नाव लावायला सुरुवात केली आहे, आणि हातात येईल ते लोकांना वाटत सुटलाय, प्रसाद म्हणून…… काय हरकत आहे, नाहीतरी नोकरी करून नाहीतरी आयुष्याचे कल्याण होणार नाहीच. अशी समजूत होण्यास सुरुवात झालीच होती, नाहीतरी..!!

शेवटी काय सांगायचा मुद्दा असा कि आजचे तारुण्य भरकटायला लागले आहे, ज्यांना आपण आयुष्याचा आदर्श मानतो, तेच आपली मारतात.. आपल्याला गोंधळात टाकतात, आपल्या भावना आज काल अनावर होताना दाखवतात, स्वतःला खोलीमध्ये दिवस दिवस बंद करून घेतात, इंटरनेट वर टीव-टीव करत राहतात, एका वेळी १०-१० रुमाल ओले करत सुटतात, अश्या गोष्टींची जबाबदारी जरी मिडिया वर टाकली तरी, भावनांना कुठे, कधी, कसा आवर घालावा हे ज्याचे त्याने उमजून घ्यावे.

शेवटी आम्ही कितीही केले तरी आमची अवस्था जशी आहे तशीच आहे, तेलही गेले, तूप ही गेले सारखी... त्यात सुधारणा आमची आम्हालाच करायची आहे... करूच, पण आपला आदर्श आपण स्वतःला मानून…

लहानपणा पासून असा त्याचा प्रभाव माझ्यावर जडला,
देव माझा असा घडला, देव माझा तसा घडला,
शेवटी एक दिवस असा येऊन पडला,
देवच माझा एके दिवशी रडला,
तेव्हापासून माझ्या काही अंशी नजरेतूनच पडला... नजरेतूनच पडला....!!!

(वरील विचार वैयक्तिक रित्या माझे स्वतःचे आहेत, आणि ते व्यक्त करण्यापुरते मर्यादित आहेत, याचा चालू घटनेशी, किंवा कोणत्याही जीवित-मृत व्यक्तीशी संबंध नाही, आणि तसे तुम्हाला वाटलेच, तर तो तुमचा प्रश्न, आणि तुमचा दृष्टिकोण, दुसरे असे कि येथे फक्त भावना व्यक्त केल्या आहेत, उगाच पब्लिसिटी स्टंट वगैरे आहे असा विचार ही तुमचा स्वतःचा असेल. चित्र सहाय्य: गुगल. हा लेख आमच्या इनर-सर्कल या मित्र-कंपनीला समर्पित)

4 comments:

Vaibhav Gaikwad said...

वेड लागले, वेड लागले,
या जनांसी वेड लागले

पूर्वी आपला देश 'गारुड्यांचा देश' म्हणून ओळखला जायचा. आता बहुतेक 'बाबां'चा देश म्हणून ओळखला जावा इतके बाबा झाले आहेत या देशात. या बाबांचे मोठमोठ्या राजकारणी आणि इतर दिग्गजांशी साटेलोटे असल्याने त्यांचे एक पूर्ण नेटवर्क तयार झाले आहे. चार कवड्या सामाजिक कार्यात दान करायच्या आणि उरलेल्या गडगंज संपत्तीचा उपभोग घ्यायचा. कित्येकांनी या बाबांच्या आशीर्वादाने आपल्या काळ्याचे पांढरे करून घेतले. मरणोत्तर कुणाबद्दल वाईट बोलू नये असा संकेत आहे, तरीही देशाला पडलेल्या या पाशातला एक गुंता तरी सुटला म्हणून आनंद. राहिला सचिनच्या श्रद्धेचा आणि वैयक्तिक जीवनाचा भाग, त्याचे असे जाहीर प्रदर्शन म्हणजे अमिताभने भर चौकात राखी सावंतभवती पिंगा घालण्यासारखाच निंदनीय होता.

Avinash said...

जागतिकीकरणाचे जसे बरेच फायदे झाले तसा हा एक भुर्दंड आहे असे मानायला हरकत नाही. लोक स्वत:ला असुरक्षित समजू लागले. त्यामुळे मग कुणीतरी बाबा पकडायचा आणि त्याच्या नावाने अध्यात्माचे धडे गिरवायचे. घरचे मोठेच असे करू लागल्याने छोटेही त्याच्या मागे लागलेत. काही महाभाग अन्न, वस्त्र, निवारा यानंतर अध्यात्म ही चौथी गरज आहे अशी भाषणे ठोकू लागलेत. आसाराम बोलतो की व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यामुळे एड्स होतो पण त्याच्या पोरावर नरबळीचा आरोप आहे त्याबद्दल मूग गिळतो. मेलेला सोडा पण सध्याच्या एका बाबावर हिंदू दहशतवाद्यांना 'जीवनाचा मार्ग' शिकवल्याचा आरोप आहे. तशी जबानीच एकाने दिलीय असे एका ओळखीच्या आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले आहे. राजकारणी आणि बाबा दोघेही एकमेकांच्या फायद्यासाठी युती करून आहेत. आणि याच्यात मूर्ख जनतेचा बळी जातोय. या बाबा नावाच्या महाभागांमुळे भारत पुन्हा एकदा गुलामीत ढकलला जातोय याची कल्पना लोकांना कशी येत नाही याचे दुर्दैव वाटते.

Bhushan Kolte said...
This comment has been removed by a blog administrator.
Rahul Velapure said...
This comment has been removed by a blog administrator.